औरंगाबाद : जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६७५ मि.मी. एवढी असताना पावसाळा निम्मा संपत आला तरी सरासरीच्या अवघा २८ टक्केच पाऊस जिल्ह्यात बरसला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत किंचितही वाढ झालेली नाही.
दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर वरुणराजाचे आगमन झाल्याने शेतकर्यांत आनंद व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सर्व जिल्ह्यात पाऊस पडत आहे. काल एकाच दिवशी कन्नड तालुक्यात तब्बल ७८ मिमी एवढा पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात५२. ५०, सोयगाव ५६. ६७ तर खुलताबाद तालुक्यात ४१. ५६ मिमी पावसाची नोंद झाली. वैजापूर तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. या तालुक्यात ३३ मिमी पावसाची नोंद झाली तर गंगापूर २८, औरंगाबाद २०, फुलंबी १६ तर पैठण तालुक्यात १७ मिमी पाऊस झाला आहे. जून महिन्यात औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यावर कृपा करणार्या पावसाने यावेळी गंगापूर, वैजापूर, कन्नड सह सर्वच तालुक्यात थोड्याफार प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आणि शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे.
दोन तालुक्यात सरासरी ओलांडली
जिल्ह्यात सिल्लोड (१०३ टक्के) आणि वैजापूर (१०४) तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत पडणार्या पावसाच्या तुलनेत या दोन तालुक्यात अधिकचा झाला आहे. हे दोन तालुके वगळता इतर तालुक्यात मात्र वरुणराजाने फारशी हजेरी लावली नाही. फुलंब्री तालुक्यात आतापर्यंतच्या सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात ८९, गंगापूर ७१, कन्नड ७७, औरंगाबाद ७०, खुलताबाद ४१, पैठण ४७ टक्के पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.
वार्षिक सरासरीच्या २८ टक्केच पाऊस
दरम्यान जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६७५ मिमी एवढी आहे. आज पर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९४. ९६ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस खूपच कमी आहे.